तूर्तास
सगळ्यांचा सगळ्यांशी
सगळ्याच ठिकाणी झाला आहे
एक अलिखित करार
कोणीच कोणावर करायची नाही
खरोखर टीका
कोणीच कोणाचे कोणतेही
मूल्यमापन करायचे नाही
केलेही चुकून तरीही
त्याबाबत मोठ्याने
बोलायचे नाही
ज्याने त्याने रेटायचे
आप आपले म्हणणे ठासून
घासून,पुसून, तासून
शक्य तेवढे ते
टोकदार करायचे
परस्परांनी परस्परांना
शक्य तेवढे घायाळ करायचे
ठरवून खेळायचा हा
आवडता रोमन खेळ
प्याद्यांच्या जागी
माणसेच वापरायची
मधून मधून त्यांचेवर
शस्त्रही चालवून दाखवायची
असे करूनच तेवढी रिझवायची
माणसे,त्यातच त्यांची
रूची वाढवायची
उगाच खरे बोलायला गेलाच कोणी
तर त्याची त्यानेच
पापक्षालन म्हणून
मुस्कटदाबी करायची
असली प्रायश्चित्ते घेणाऱ्यांची
वाढवायची संख्या
करायची त्यांचीच बहुसंख्या
म्हणजे
लोकशाहीला कुठेच
कोणताच धोका उरत नाही
माणूसही
होतो रिकामा खोका
त्याची जाणीवही त्याला
असत नाही
खरे तर
मुळात असेच होते
म्हणतात जग सुंदर
मधल्या काळात
अनेकजण ते विस्कटून गेले
गेले तर गेले ते
पण आश्चर्य म्हणजे
लोकही बराच काळ
त्यांनी सोबत नेले
आता परस्परात झालेल्या
अलिखित करारानुसार
पुनः असे होऊ द्यायचे नाही आहे,
झालेच चूकून तर
आपणच पुनः
आपले तोंड पहायचे नाही आहे
---श्रीपाद भालचंद्र जोशी