Menu
Log in


Log in


पुनः झाले सुरू नव्याने... - २६ मार्च २०२२

26 Mar 2022 9:02 AM | Amol Sawarkar (Administrator)

लोक घरी राहू लागले होते

मात्र

जबरदस्तीने

पण म्हणून ते काही वाचू लागले होते

असे नाही

किंवा ऐकू लागले

एकमेकांचे काही

असेही नाही

उलट

आपलेच ऐकवून घरातल्यांचाच

छळ जरा जास्तच करू लागले

असेही नाही की

काही करून बघण्याचा

आनंद घेऊ लागले

गुन्हे कमी करू लागले,

शांत, छान वाटू लागले

असेही काहीच झाले नाही

रमू लागले आपल्याच धुंदीत

खेळू लागले जुनेच खेळ,नव्याने

काटाही तसाच काढू लागले काट्याने

जगण्याच्या

जुन्याच वाटा मोकळ्या

करून मागू लागले

ओळखीच्याच वाटांनी

डोळे झाकून अधिकच

जाऊ लागले

विचारांशी तर शत्रुत्वच होते

घरबसल्या ते अधिकच वाढवू लागले 

आपल्या सावल्या देखील बघण्याचे

टाळू लागले, इतक्या त्या

बसल्या बसल्या अक्राळविक्राळ झाल्या

आणि

अज्ञान पांघरून जगणाऱ्या,

प्रचंड धोकादायक,

निरर्थक जगणाऱ्या,

भावनाविहीन लोकांच्या

संख्या,ठिकठिकाणी वाढू लागल्या

लोक बरे होऊ लागले आहेत

असे उगाच वाटत गेले

संपर्कच तुटल्याने असेल

आभाळही प्रत्येकाचे अधिकच फाटत गेले

काही काळ तर पृथ्वीची प्रकृती

सुधारल्याचे वाटत गेले

गावात,घरात, बाल्कनीत नाचणाऱ्या

मोरांचे फोटोही वाटले गेले

मात्र नियंत्रणे उठली जरा 

पुनः जशीच्या तशी झाली धरा

कोणीच कोणाला नेहमीसारखे

कुठेच सापडले नाही

स्वप्ने तर बघण्याचा नव्हताच डोळा

नुसतेच रस्तोरस्ती निरर्थक

झाले गोळा

जगण्याच्या ना घडल्या नव्या रीती

ना गेली जुनी भिती

पृथ्वीवर कोसळले ते पुनः

क्षेपणास्त्र होत वेगाने

विध्वसांचे नवे पर्व

पुनः झाले सुरू नव्याने...

 ---श्रीपाद भालचंद्र जोशी