Menu
Log in


Log in


डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कविता

<< First  < Prev   1   2   Next >  Last >> 
 • 6 Apr 2022 6:28 AM | Amol Sawarkar (Administrator)

  आपल्यातले गुण तेवढे बघ

  अवगुण दाखवायला लोक आहेत

  पाय पुढेच टाक मागे ओढायला लोक आहेत

  स्वप्न मोठीच बघ ती छोटी करायला लोक आहेत

  आपली ज्योत पेटतीच ठेव विझवायला उत्सुक लोक आहेत

  असे काही कर,जे आठवणीत राहील बाता मारायला लोक आहेत

  प्रेम स्वतःवर कर द्वेष करायला लोक आहेत

  निरागस होऊन रहा शहाणपण शिकवायला लोक आहेत

  विश्वास स्वतःवर ठेव अविश्वास दाखवायला लोक आहेत

  स्वतःला सावर नीट आरसा धरायला लोक आहेत

  आपली छाप सोड आपल्या वाटेवर,गर्दी करायला लोक आहेत

  तू करून दाखव फक्त काही टाळ्या वाजवायला लोक आहेत


  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 3 Apr 2022 8:51 AM | Amol Sawarkar (Administrator)

  वर्ष नवे हे ज्याचे त्याचे वेगवेगळे

  ज्याचे त्याचे तसेच ते

  राहील बघा सुखानेच ते

  जाईल बघा रंग वेगळे

  ढंग वेगळे चाल वेगळी

  ज्याची त्याची एकसारखी

  करू नका अपुला हेका

  धरू नका घास वेगळा

  श्वास वेगळा ध्यास वेगळा

  ज्याचा त्याचा मूर्त असो आभास असो

  निराकार वा आकाराचा सत्व असो तो

  तत्त्व असो स्वत्व असो वा

  साक्षात्कारही सत्याचा

  ज्याला त्याला लखलाभ असो

  आत्मा आतील ज्याचा त्याचा

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 2 Apr 2022 8:47 AM | Amol Sawarkar (Administrator)

  अशा उभारा तशा उभारा

  माणूस असण्याच्याच गुढ्या

  माणुसकीच्यासाठी वाहा

  प्रेमा प्रेमाच्याच जुड्या

  विटलेले ते कुस्करलेले

  केलेले ते चोळामोळा

  कुठल्याही रंगांचे सारे

  करा करा ते ध्वजही गोळा

  मिळून सारे एक उभारा

  मानवतेची पुनः गुढी

  सोडून सारी क्षुद्र क्षुद्रता

  माणूस म्हणून घ्या उंच उडी

  साऱ्यांचीच असे येथली

  मिळून सारी विशाल धरती

  विजय म्हणून जो मिळवायाचा

  मिळवा मिळवा अपुल्यावरती

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 31 Mar 2022 6:38 AM | Amol Sawarkar (Administrator)

  उजवे मला उजवा

  समजतात

  डावे समजतात डावा

  तिरपे समजतात

  माझे तोंड वाकडे

  सरळ होण्यासाठी

  घालतात साकडे

  मधले समजतात

  त्यांच्यातलाच

  टाळ्या वाजवायला

  शिकवतात

  या साऱ्यांपासून

  दूरचे मला अधिकच

  दूरचा समजतात

  कुठे उभा राहून पाहू

  मी माझ्याकडे

  जिथून पडणार नाही

  माझे पाऊल वाकडे

  साऱ्याच जागा

  सारख्याच निसरड्या

  झाल्या आहेत...

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी

 • 29 Mar 2022 6:37 AM | Amol Sawarkar (Administrator)

  मी एक अतिअल्पसंख्यांक

  मी एक

  मतिअल्पसंख्यांक

  ज्यांच्याजवळ आहे अति

  त्यांची होऊ नये माती म्हणून

  त्यांना अधिकाधिक सोयी, सवलती देतच जाणारा अति

  ज्यांची भ्रष्ट झाली आहे

  अशी मति त्यांच्या प्रकृतीला

  आराम पडो म्हणून

  प्रार्थना करणारा

  मी एक अतिअल्पसंख्यांक

  मति ठिकाणावर ठेवून

  विचार करणारा

  डोळ्यांवर

  कातडे ओढण्याचे

  समुहादेश

  नाकारणारा

  समुपदेशन करणारा

  अविवेकी पाठशाळांचे

  मी एक अतिअल्पसंख्याक

  अवशेष, विवेकाच्या पाठशाळांचे

  मी एक

  अतिअल्पसंख्याक

  अजूनही बोलतो शब्द,अर्थ

  तळागाळातल्यांचे

  सामाजिक न्यायाच्या झालेल्या

  ठिकऱ्या गोळा करत फिरतो

  सावध असा म्हणतात याच्यापासून हा तर सरळ डोक्यातच शिरतो

  मी एक किडा अकल्याणाच्या व्यवस्था पोखरणारा

  मी एक कोळी

  हे जाळे विस्तारणारा

  मी एक म्हणूनच

  अतिअल्पसंख्याक

  माझ्यावरच आहे संतुष्ट

  कृपया मला अनुदानित करू नका

  अनुग्रहित तर नकाच नका

  माझ्या नावाचे असतीलच

  काही लाभ तर

  तेही तुम्हीच वाटून घ्या

  करायचेच असेल तर

  एवढेच करा अशा अतिअल्पसंख्यांकांची

  वाढेल संख्या,होतील ते बहुसंख्य याचेच तेवढे प्रयत्न करा

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 27 Mar 2022 9:05 AM | Amol Sawarkar (Administrator)

  तूर्तास

  सगळ्यांचा सगळ्यांशी

  सगळ्याच ठिकाणी झाला आहे

  एक अलिखित करार

  कोणीच कोणावर करायची नाही

  खरोखर टीका

  कोणीच कोणाचे कोणतेही

  मूल्यमापन करायचे नाही

  केलेही चुकून तरीही

  त्याबाबत मोठ्याने

  बोलायचे नाही

  ज्याने त्याने रेटायचे

  आप आपले म्हणणे ठासून

  घासून,पुसून, तासून

  शक्य तेवढे ते

  टोकदार करायचे

  परस्परांनी परस्परांना

  शक्य तेवढे घायाळ करायचे

  ठरवून खेळायचा हा

  आवडता रोमन खेळ

  प्याद्यांच्या जागी

  माणसेच वापरायची

  मधून मधून त्यांचेवर

  शस्त्रही चालवून दाखवायची

  असे करूनच तेवढी रिझवायची

  माणसे,त्यातच त्यांची

  रूची वाढवायची

  उगाच खरे बोलायला गेलाच कोणी

  तर त्याची त्यानेच

  पापक्षालन म्हणून

  मुस्कटदाबी करायची

  असली प्रायश्चित्ते घेणाऱ्यांची

  वाढवायची संख्या

  करायची त्यांचीच बहुसंख्या

  म्हणजे

  लोकशाहीला कुठेच

  कोणताच धोका उरत नाही

  माणूसही

  होतो रिकामा खोका

  त्याची जाणीवही त्याला

  असत नाही

  खरे तर

  मुळात असेच होते

  म्हणतात जग सुंदर

  मधल्या काळात

  अनेकजण ते विस्कटून गेले

  गेले तर गेले ते

  पण आश्चर्य म्हणजे

  लोकही बराच काळ

  त्यांनी सोबत नेले

  आता परस्परात झालेल्या

  अलिखित करारानुसार

  पुनः असे होऊ द्यायचे नाही आहे,

  झालेच चूकून तर

  आपणच पुनः

  आपले तोंड पहायचे नाही आहे

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 26 Mar 2022 9:02 AM | Amol Sawarkar (Administrator)

  लोक घरी राहू लागले होते

  मात्र

  जबरदस्तीने

  पण म्हणून ते काही वाचू लागले होते

  असे नाही

  किंवा ऐकू लागले

  एकमेकांचे काही

  असेही नाही

  उलट

  आपलेच ऐकवून घरातल्यांचाच

  छळ जरा जास्तच करू लागले

  असेही नाही की

  काही करून बघण्याचा

  आनंद घेऊ लागले

  गुन्हे कमी करू लागले,

  शांत, छान वाटू लागले

  असेही काहीच झाले नाही

  रमू लागले आपल्याच धुंदीत

  खेळू लागले जुनेच खेळ,नव्याने

  काटाही तसाच काढू लागले काट्याने

  जगण्याच्या

  जुन्याच वाटा मोकळ्या

  करून मागू लागले

  ओळखीच्याच वाटांनी

  डोळे झाकून अधिकच

  जाऊ लागले

  विचारांशी तर शत्रुत्वच होते

  घरबसल्या ते अधिकच वाढवू लागले 

  आपल्या सावल्या देखील बघण्याचे

  टाळू लागले, इतक्या त्या

  बसल्या बसल्या अक्राळविक्राळ झाल्या

  आणि

  अज्ञान पांघरून जगणाऱ्या,

  प्रचंड धोकादायक,

  निरर्थक जगणाऱ्या,

  भावनाविहीन लोकांच्या

  संख्या,ठिकठिकाणी वाढू लागल्या

  लोक बरे होऊ लागले आहेत

  असे उगाच वाटत गेले

  संपर्कच तुटल्याने असेल

  आभाळही प्रत्येकाचे अधिकच फाटत गेले

  काही काळ तर पृथ्वीची प्रकृती

  सुधारल्याचे वाटत गेले

  गावात,घरात, बाल्कनीत नाचणाऱ्या

  मोरांचे फोटोही वाटले गेले

  मात्र नियंत्रणे उठली जरा 

  पुनः जशीच्या तशी झाली धरा

  कोणीच कोणाला नेहमीसारखे

  कुठेच सापडले नाही

  स्वप्ने तर बघण्याचा नव्हताच डोळा

  नुसतेच रस्तोरस्ती निरर्थक

  झाले गोळा

  जगण्याच्या ना घडल्या नव्या रीती

  ना गेली जुनी भिती

  पृथ्वीवर कोसळले ते पुनः

  क्षेपणास्त्र होत वेगाने

  विध्वसांचे नवे पर्व

  पुनः झाले सुरू नव्याने...

   ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 24 Mar 2022 6:04 AM | Amol Sawarkar (Administrator)

  हे,ते मुक्त करण्यापेक्षा

  हे जग,सरळ द्वेषमुक्तच

  करू,असे का म्हणत

  नाही कोणी

  कुठल्या

  दिशेने गेले

  म्हणजे हे घडवून

  आणेल कोणी

  आचारसरणी,विचारसरणी

  एवढी करतात पायाभरणी

  अशी कशी मग असते करणी

  वरच्या इमारतीत स्थिरावल्यावर

  त्यांना सोडून यांचे

  यांना सोडून त्यांचे

  धरतात लोक बोट

  गोंधळल्यावर

  गोंधळमुक्तच करण्याचे सारे

  वहात का नाहीत वारे

  स्वच्छ आभाळ,मोकळे तारे

  कधीच का म्हणत नाही कोणी करू

  किती बघायची

  वाट कोणाची

  आपले आपणच

  हे सारे का न करू?

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 23 Mar 2022 6:08 AM | Amol Sawarkar (Administrator)

  युद्ध स्मारकांवर अभिव्यक्तीच्या स्पर्धा,

  शांततेचा कोणताही प्रकल्प का म्हणून नेहमीच अर्धा?

  पूर्णत्वाला जातच नाही कधीच कुठेच का म्हणून तो,

  युद्धाचाच वारा केंव्हाही,कुठेही,का म्हणून असा अचानक वाहतो?

  वीरश्रीचा संचार म्हणजे

  संहारच का असतो?

  शांतीचा दूत कुठलाही

  शांतीवीर का नसतो?

  शांततेसाठी तर लागतही नाही

  जमवाजमव द्वेषाची, सैन्याची,

  गरजही नसते अस्त्र,शस्त्र,

  अण्वस्त्रांची

  दरवर्षीच्या

  अंदाजपत्रकात

  त्यासाठी भरघोस तरतूदही लागत नाही वाढती

  कोणताच पक्ष,

  कोणतीच बाजू,

  कधीच म्हणत नाही,

  काढ ती

  युद्धात तर तुलनेने

  कमीच मरतात माणसे

  रोगराई,पूर,भूकंप,कुपोषण,

  दुष्काळानेच अधिक मरतात

  कोणत्या

  शांतीधर्मस्थापकाने

  केले होते कधी

  शांतीसाठी युद्ध

  कधी केला होता नरसंहार त्यांनी,कधी केले होते जीवन ध्वस्त,कधी केली होती

  गाव,खेडी,नगरे,प्रजा उध्वस्त

  एवढी का असते शांती नावडती सत्तासुतांची कुठल्याही,युद्धोद्योगाशिवाय यांना जग का चालवता येत नाही?

  तरीही का असतात

  हेच आपले महानायक,

  हवेतच कशाला

  आपल्याला नेते असे लायक

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


 • 22 Mar 2022 5:59 AM | Amol Sawarkar (Administrator)

  मरोत कुणीकडचीही

  दोन्हींकडची मरतात ती

  शेवटी माणसेच

  असतात

  दोन्हीकडच्यांना

  दोन्ही कडे,माय,बाप

  बायका,पोरे सारखीच

  असतात

  दोन्हीकडे ती सारी

  सारखीच रडतात

  कोसळूनही

  सारखीच पडतात

  डोळ्यातले

  सारखेच असते

  पाणी

  दोन्हीकडे

  रूधिराभिषेक म्हणा,

  म्हणा रक्ताचे सडे,युद्ध वाजवत असते नेहमीच

  माणसांच्या कातडीचे चौघडे

  दोन्हीकडच्या

  मरणाऱ्यांनाही

  दोन्हीकडे

  शहीदच म्हणतात

  वेळ येते ज्यांच्यावर

  सोडून जाण्याची देश

  तेंव्हा दोन्हीकडच्यांनाही

  विस्थापितच म्हणतात

  सारे काही सारखेच

  दोन्हीकडे असते,दोन्हीकडे

  तरी मग

  मैत्र का नसते?

  कोण असते शत्रू नेमके

  कोणाचे,दोन्हीकडे

  कोण ठरवतो घरबसल्या

  हे दोन्हीकडे

  कधी गळ्यात गळा,

  फुलांच्या माळा

  कधी स्फोट,विस्फोट

  घरादारांच्या होळ्या

  कोण चालवतो

  कुठे बसून

  कोणाच्या खांद्यावरून

  गोळ्या

  खांद्याला का लावून

  घेत नाहीत ते जमिनीवर दोन्हीकडचे खांदे,

  आभाळ तर वरचे त्यांना नेहमीच सांधे

  ---श्रीपाद भालचंद्र जोशी


<< First  < Prev   1   2   Next >  Last >>