युद्ध स्मारकांवर अभिव्यक्तीच्या स्पर्धा,
शांततेचा कोणताही प्रकल्प का म्हणून नेहमीच अर्धा?
पूर्णत्वाला जातच नाही कधीच कुठेच का म्हणून तो,
युद्धाचाच वारा केंव्हाही,कुठेही,का म्हणून असा अचानक वाहतो?
वीरश्रीचा संचार म्हणजे
संहारच का असतो?
शांतीचा दूत कुठलाही
शांतीवीर का नसतो?
शांततेसाठी तर लागतही नाही
जमवाजमव द्वेषाची, सैन्याची,
गरजही नसते अस्त्र,शस्त्र,
अण्वस्त्रांची
दरवर्षीच्या
अंदाजपत्रकात
त्यासाठी भरघोस तरतूदही लागत नाही वाढती
कोणताच पक्ष,
कोणतीच बाजू,
कधीच म्हणत नाही,
काढ ती
युद्धात तर तुलनेने
कमीच मरतात माणसे
रोगराई,पूर,भूकंप,कुपोषण,
दुष्काळानेच अधिक मरतात
कोणत्या
शांतीधर्मस्थापकाने
केले होते कधी
शांतीसाठी युद्ध
कधी केला होता नरसंहार त्यांनी,कधी केले होते जीवन ध्वस्त,कधी केली होती
गाव,खेडी,नगरे,प्रजा उध्वस्त
एवढी का असते शांती नावडती सत्तासुतांची कुठल्याही,युद्धोद्योगाशिवाय यांना जग का चालवता येत नाही?
तरीही का असतात
हेच आपले महानायक,
हवेतच कशाला
आपल्याला नेते असे लायक
---श्रीपाद भालचंद्र जोशी