Menu
Log in


Log in


इतिहासात २० जानेवारी

20 Jan 2022 5:49 AM | Amol Sawarkar (Administrator)

१८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबरी कार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म

कानिटकर, काशीबाई गोविंदराव | महाराष्ट्र नायक

कृष्णराव बापट या वकिलाच्या घरात काशीबाईंचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न गोविंदराव कानिटकरांशी झाले. गोविंदरावांचे चुलते नारायण बापुजी कानिटकर हे कट्टर टिळकपंथीय होते. सनातन्यांच्या बाजूने सुधारकांवर टीका करण्याची संधी ते सोडत नसत. मात्र गोविंदरावांचा कल सुधारकांकडे राहिला. ‘आपल्या पत्नीने शिकायला हवे’ हा विचार ते तेव्हा बोलून दाखवत असत आणि प्रत्यक्ष लग्न झाल्यावर त्यांनी काशीबाईंना शिकवलेही. त्या काळात पति-पत्नी घरच्या वडीलधार्‍या मंडळींना न सांगता ‘प्रार्थना समाजा’च्या वा ‘मराठी ज्ञानप्रसारक सभे’च्या व्याख्यानांना जात असत. गोविंदराव कानिटकर मुन्सफ होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर काशीबाईंना सभासंमेलनांना जावे लागे. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांच्याशी काशीबाईंचा स्नेह राहिला. रमाबाई रानडे यांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी आणि पुढे सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिले. गोविंदरावांना इंग्रजी व मराठी साहित्यात रस होता.

     अव्वल इंग्रजीच्या काळात स्त्री-शिक्षणाची सुविधा प्राप्त झाली असली, तरी स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात शिकत होत्या असा भाग नव्हता. काशीबाईंना गोविंदरावांनी शिकवले आणि त्या काळातील एक सुशिक्षित, बुद्धिमान स्त्री आणि लेखिका म्हणून त्यांच्याकडे समाज तेव्हा व नंतरही आदराने पाहत आला आहे. १९०४ साली पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या त्या एकमेव स्त्री  होत्या.

१८९८: मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. 

imgसंगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वाला लाभलेले एक वरदान ! गळ्यात विलक्षण फिरत असलेली घराणेदार शास्त्रीय संगीत गायकी, अनेक अनवट राग व जोड रागांचे निर्माणकर्ते, बंदिशींचे रचनाकार, मराठी संगीत रंगभूमीवरील सर्जनशील संगीतकार-गायक नट, मराठी चित्रपट संगीत विश्वातील अनेक नवीन प्रयोगांचे आद्य प्रवर्तक, देशकार्यात संगीताच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान देणारे निष्ठावान देशभक्त.. अश्या अनेक पैलूंनी समृद्ध असलेले सिद्धहस्त मास्तर कृष्णरावांचे कार्य आजही अभ्यासू गायक, कलाकार आणि गुणीजनांना मार्गदर्शक ठरणारे व आत्मिक आनंद देणारे आहे.

यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी देवाची आळंदी येथे आजोळी सौभाग्यवती मथुराबाई फुलंब्रीकर यांच्या पोटी झाला. मास्तरांचे घराणे वेदपठण करणाऱ्या देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणांचे. मराठवाड्यातील 'फुलंब्री' हे मास्तरांच्या घराण्याचे मूळ गाव असून वेदपठण करणारे याअर्थी 'पाठक' हे मूळ आडनाव होते. नानासाहेब पेशवे सरकारांनी त्या वेदज्ञानी पूर्वजाचा यथोचित आदरसत्कार करून त्यास 'आजपासून आपण फुलंब्रीकर म्हणून ओळखले जाल," अशा शब्दांत गौरविले. या घटनेमुळे मास्तरांच्या घराण्याचे मूळ आडनाव जे पाठक होते ते बदलून 'फुलंब्रीकर' असे झाले

"नाट्यकला प्रवर्तक" या मराठी संगीत नाट्यसंस्थेत बाल गायकनट म्हणून भूमिका करण्याची संधी मिळाली. तिथे मास्तरांना नाट्यपदांकरिता सवाई गंधर्व आणि उस्ताद निसार हुसेन खान यांचे संगीत मार्गदर्शन लाभले.

एकदा नाटयकला प्रवर्तक संस्थेचे संगीत नाटक बघायला "पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" आणि "गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले" एकत्र आले होते. त्यावेळेस कृष्णाच्या गाण्यातील गोडवा, कल्पकता आणि चतुराई बखलेबुवांनी हेरली. कृष्णा जेव्हा त्या दोन थोर कलावंतांच्या पाया पडला तेव्हा बखलेबुवांनी, "हा मुलगा नीट गाणे शिकल्यास पुढे मोठा गवई होईल," असे कौतुकाने उद्गार काढले. योगायोगाने त्याच सुमारास म्हणजे १९११ साली गंडाबंधन होऊन मास्तरांचे शास्त्रीय गाण्याचे शिक्षण बखलेबुवांकडे सुरू झाले.

गुरुवर्य भास्करबुवांकडे गाणे शिकण्यास आरंभ केल्यानंतर थोड्याच अवधीत बुवांनी लहान वयातील कृष्णाला स्वतंत्र मैफल सादर करण्यात तयार केले. बुवांनी कृष्णाची पहिली जाहीर मैफल सन १९११ मध्ये म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी महाराष्ट्रातील धुळे येथील कमिन्स क्लबमध्ये आयोजित केली. त्यावेळी कृष्णाने मैफलीत तयारीने अप्रतिम गायन सादर केले आणि सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. पितृतुल्य असलेल्या गुरुवर्य बखलेबुवांनी प्रेमाने शिष्याची पाठ थोपटून आशीर्वाद दिला. धुळे येथील मैफल गाजवल्यानंतर लगेचच कृष्णाचा पुणे येथील किर्लोस्कर थिएटरमध्ये जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. साहित्यसम्राट न. चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर यांनी त्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यावेळी साहित्यसम्राट केळकर यांनी बालगायक कृष्णाला सुवर्ण पदक बहाल करून कौतुकाने 'मास्टर कृष्णा' अशी उपाधी दिली. तेव्हापासून कृष्णाचा उल्लेख सर्वत्र मास्टर कृष्णा असा होऊ लागला

संदर्भ

https://maharashtranayak.in/kaanaitakara-kaasaibaai-gaovaindaraava

https://masterkrishnarao.com/