१८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म.
इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय.वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा.सी.बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार श्री.वा.सी.बेंद्रे यांचा जन्म दि. १३ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे इंग्रजी चौथी ते मैंट्रीक पर्यंत मुंबई येथील विल्सन हायस्कूल मध्ये झाले. त्या काळी परीक्षेसाठी सोळा वर्षे वयाची अट होती. त्यामुळे व घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे चौदाव्या वर्षीच त्यांना जी.आय.पी. ऑडीटमध्ये बिन पगारी उमेदवारी पत्करावी लागली. तेथे ३ महिन्यात ते टंकलेखन शिकले व लघुलेखन पद्धतीचा अभ्यास करून अलेनब्रदर्स मध्ये नोकरीला लागले. १९१३ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी लघुलेखन (Short-hand) परीक्षेत पहिल्या नंबरने सुवर्णपदक घेऊन उतीर्ण झाले,
१९१८ मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. महाराष्ट्राचा १७ व्या शतकाचा इतिहास हे संशोधनांचे क्षेत्र बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले. एक साधन-संग्राहक,साधनसंपादक,साधनचिकित्सक,संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या. सन १९२८ मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड "साधन चिकित्सा" हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. .हा ग्रंथ प्रसिद्ध करून विशेषतः नवीन अभ्यासक आणि संशोधक ह्यांना त्यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले
इतिहास संशोधक बेंद्रे ह्यांचे अगाध कार्य, चिकाटी व इतिहासा विषयीचा त्यांचा अभ्यास पाहून ,१९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून श्री. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन वा.सी.बेंद्रे यांना सरकारी " हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर" म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले.
दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली. इंग्लंड मधील वास्तव्यामुळे बेंद्रे यांचे संशोधन-संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले.
छत्रपति संभाजी महाराज (१९६०) हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या कारकीर्दीचा क्षण न् क्षण त्यांनी परकीय आक्रमणाशी झगडण्यात घालविला व शेवटी स्वतःचे बलिदान केले, असा निष्कर्ष बेंद्रे ह्यांनी ह्या ग्रंथात काढलेला आहे. त्यांनी बलिदान केले की त्यांचे बलिदान झाले याविषयी मतभेद होऊ शकेल, तथापि संभाजी महाराजांबद्दलच्या रूढ समजुतींना बेंद्रेकृत ह्या चरित्राने धक्का दिला.
संत तुकाराम महाराजांबद्दलही बेंद्रे ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. १९५० मध्ये श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजकृत श्रीमद्भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता त्यांनी संपादिली. ह्या मंत्रगीतेला त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर त्यांनी पुष्कळच नवीन प्रकाश टाकला आहे. तथापि मंत्रगीता संत तुकारामांची नाही, हेच मत ग्राह्य आहे. देहूदर्शन (१९५१), तुकाराम महाराज ह्यांचे संतसागाती (१९५८), तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा (१९६०) आणि संत तुकाराम (१९६३) हे त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ तुकाराम महाराजांचा कालखंड व त्यांचे जीवन ह्यांवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनेमहत्त्वाचे आहेत.
त्यांच्या अन्य ग्रंथांत सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कृत्बशाही (१९३४), अ स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स (१९४४), महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरिअड (१९६०) व श्री छत्रपती शिवाजी महाराज (१९७२) इ. ग्रंथांचा त्यात समावेश होतो. तारीख–इ–इलाही (१९३०), राजाराम चरितम् (१९३१) हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ होत. लघुलेखनावरही त्यांनी मराठी ग्रंथलेखन केले आहे.
१९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन.
भाऊराव कोल्हटकर यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ रोजी झाला. त्यांचे शिक्षण बडोदा येथेच झाले. ते जरी फार शिकलेले नसले तरी लेखनिक होण्यापुरते शिक्षण असल्याने बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात कारकून म्हणून नोकरीला लागले. याच काळात अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीचा ३१ ऑक्टोबर १८८० रोजी शुभारंभ केला. त्यावेळी नाटकातील स्त्रीभूमिका पुरुषच करीत. तत्कालीन समाजव्यवस्थेमधे स्त्रियांनी नाटकात काम करणे लोकांच्या पचनी पडणे अवघड होते.
शाकुंतलच्या शुभारंभानंतर दोन वर्षांनी आपल्या नाटकातील स्त्रीभूमिका करण्यासाठी अण्णासाहेबांनी देखणे रूप आणि आवाज यामुळे भाऊरावांची निवड केली आणि २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांचा वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश झाला.
संगीत नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग अतिशय चोखंदळ असल्यामुळे स्त्रीसुलभ सवयी त्यांनी आत्मसात केल्या होत्या, तसेच साडी नेसून शोभेसा साजशृंगार करणे व बायकी आवाज व भूमिकेशी प्रसंगानुरूप गाणे म्हणणे ही दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पार पडली. इ. स. १८८२ ते १८८९ पर्यंत भाऊरावांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर १९०० पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या. वर्ष १८८५ मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर भाऊराव कोल्हटकर किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार झाले.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी सुरू केलेल्या संगीत रंगभूमीची परंपरा त्यांनी आपल्या १८-१९ वर्षांच्या कारकिर्दीत चांगल्या प्रकारे समृद्ध केली, त्यामुळे महाराष्ट्रातील संगीत रंगभूमीचा खरा प्रसार व उत्कर्ष भाऊरावांनीच केला असे म्हणावे लागेल. १७ मार्च १९०० रोजी पुण्याच्या आर्यभूषण नाटकगृहात भाऊरावांनी शारदा नाटकात केलेली 'कोदंडा'ची भूमिका शेवटची ठरली. १३ फेब्रुवारी १९०१ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ
https://vishwakosh.marathi.gov.in/29539/
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainikprabhat-epaper-dailypra/vividha+bhaurav+kolhatakar-newsid-n253712618?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=click