Menu
Log in


Log in


इतिहासात ११ फेब्रुवारी

11 Feb 2022 5:47 AM | Amol Sawarkar (Administrator)

१९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. 

Amit Yadav Gauri Deshpande 001.jpgगौरी देशपांडे यांचा पुण्यात जन्म झाला. विख्यात मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे या त्यांच्या आई, तर थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचे आजोबा होते. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. शालेय शिक्षण अहिल्यादेवी शाळेत झाले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी एमए ही पदवी प्राप्त केली. एस. नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.

आईच्या निधनानंतर आईवर लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख ही मराठी भाषेत छापून आलेली त्यांची पहिली साहित्यकृती होती. या लेखाची वाचकांनी प्रशंसा केली. त्यांची मातृभाषेतील साहित्यलेखनाची सुरुवात या लेखापासूनच झाली.मराठीत लोकप्रिय ठरलेल्या त्यांच्या लिखाणापैकी ‘एकेक पान गळावया’ (१९८५), ‘आहे हे असे आहे’ (१९८६), ‘निरगाठी आणि चंद्रिके गं सारिके गं’ (१९८७), ‘गोफ’ (१९९९) आणि ‘उत्खनन’ (२००२) ही काही कादंबर्‍यांची नावे. १९७० साली प्रकाशित झालेला ‘The Lackadaisical Sweeper: Short Stories’ हा इंग्रजीतील सुप्रसिद्ध लघुकथासंग्रह त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदानापैकी एक. 

गौरी देशपांडे यांचे लिखाण मराठीतील उत्कृष्ट स्त्रीवादी लिखाणांपैकी आहे. त्यांच्या लिखाणात वास्तववादी चित्रण असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यांनी ‘The position of women in India’ (स्त्रियांचे भारतातील स्थान) या विषयी पत्रक छापले होते. त्यांनी लिहिलेल्या ‘पाऊस आला मोठा’ नावाच्या एका लघुकथेवर आधारित ‘आम्ही दोघी’ नावाचा चित्रपट आला होता. 

लेखनाबरोबरच गौरी सुरुवातीच्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात इंग्रजी साहित्य हा विषय शिकवित असत. विंचुर्णी (फलटण) आणि मुंबईतील थोड्या कालावधीसाठीचे वास्तव्य वगळता, आयुष्याचा बराचसा काळ त्या पुण्यात होत्या. अधूनमधून छोट्या मुक्कामांसह परदेश दौरेही झाले.

संदर्भ

https://map.sahapedia.org/search/article/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/6319