२०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन.
विनायक सदाशिव वाळींबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झाले तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झाले. विद्यार्थिदशेपासून त्यांचा कल पत्रकारितेकडे होता. त्याचप्रमाणे त्यांचा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग होता. अग्रणी, ज्ञानप्रकाश, प्रभात, लोकशक्ती या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नोकरी केली. १९६२ मध्ये ते पहिल्यांदा उपसंपादक म्हणून आणि त्यानंतर रविवार आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी केसरी मध्ये काम केले.
बाळींबे १९६५ साली पत्रकारितेच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. तेथील अनुभव त्यांनी सह्याद्री मासिकामध्ये लिहिले. इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्या जवळ होते.
बाळींबे यांची बंगलोर ते रायबरेली, इंदिराजी ही पुस्तके विशेष गाजली. त्यांनी मोठ्या माणसांच्या मोठेपणाची अनेक अंगांनी उकल करण्याचा प्रयत्न केला. मानवी मर्यादांचे, दौर्बल्याचे, मोहप्रवणतेचे भान ठेवून त्यांनी जागतिक पातळीवरची महत्वाची व्यक्तिमत्त्वे लेखनविषय केली. चांगल्या जाणत्या, तयारीच्या बहुश्रुत अशा वाचकाचेही समाधान करणारी गुणवत्ता त्यांच्या लेखनात प्रकट झाली आणि ती शेवटपर्यंत अखंड टिकूनही राहिली. त्यांची इस्रायलचा वज्रप्रहार, तीन युद्धकथा, स्टॅलिनची मुलगी, पराजित अपराजित, एडविना आणि नेहरू, दुसरे महायुद्ध हिटलर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय घटनांची माहिती देणारी प्रकाशित झाली ती पुस्तके खूपच गाजली ती त्यांच्या त्रयस्थ आणि तटस्थ लेखन पद्धतीमुळे. हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते.
मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या वि. स. वाळींबे यांचे २२ फेब्रुवारी २००० मध्ये निधन झाले.
२००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन.
डॉ. लक्ष्मण देशपांडे एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते.
लक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती. त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले
संदर्भ
https://www.marathisrushti.com/articles/author-vi-sa-walimbe/
https://www.marathisrushti.com/articles/dr-laxman-deshpande/