Menu
Log in


Log in


MAKAR SANKRANT - मकरसंक्रांत

14 Jan 2019 9:13 AM | Priya Apte

हिंदू धर्मात वर्षभर येणा-या विविध सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘मकरसंक्रांत’.

विविध रुढींनी परिपूर्ण असलेल्या या सणाने कुटुंब, नातेसंबंध या परंपरेला अधिक महत्त्व दिलेले दिसते. फक्त एक दिवस नाही, तर वर्षभर सर्वांशी सामंजस्याने वागण्याचा संदेश या सणाद्वारे दिला जातो.

तीळातील स्निग्धता व गुळाची गोडी, अशा ह्या स्नेह अधिक गोडीच्या मैत्रीचा सण म्हणजे ´मकर संक्रांत´

हि स्नेह-मैत्री वाढविण्यासाठी तिळगुळाची देवाणघेवाण करीत, नवीन स्नेहसंबंध जोडत , जुने अधिक दृढ करत आणि दुरावलेली नाती पूर्ववत करण्याची संधी देणारा सण म्हणजे ‘मकरसंक्रांत

सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला, अख्या भारतात साजरा होणार सण म्हणजेमकरसंक्रांत

फार वर्षांपूर्वी संकरासूर नावाचा राक्षस लोकांना छळत होता. तेव्हा देवीने संक्रांति देवीचे रूप घेऊन ह्या संकरासुराचा संहार केला आणि लोकांना छळमुक्त केले. त्या विजयाप्रित्यर्थ केलेला आनंदोत्सव म्हणजेमकरसंक्रांत.

वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चार संक्रमणे होत असली तरी भारतीयांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला अधिक महत्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतवासियांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

पुराणात, महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक पितामह भीष्म, ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, ते बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांनी याच दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो

भारतात विविध भागांमध्ये मकर संक्रांत विविध नावाने आणि विविध प्रकारे साजरी केली जाते.हिमाचल प्रदेश, पंजाब इथे लोहडी म्हणून तर आसाममध्ये भोगली बिहू, तामिळनाडूत पोंगल म्हणून तर नेपाळमध्ये माघी म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते.

महाराष्ट्रात मकर संक्रांत तीन दिवस साजरी होते. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ असे म्हणतात, या सणांना बनवले जाणारे पदार्थ देखील शरीरासाठी पौष्टिक असतात. हवामानात उपलब्ध सर्व शेंगाभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.

संक्रांतीला तीळ, गूळ, खसखस, सुके खोबरे, शेंगदाणा या सर्व स्निग्ध पदार्थांचा वापर केलेले तीळाचे लाडू, वड्या, गूळपोळी अशा शक्तिवर्धक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. ‘तीळ’ आणि ´गूळ ´ उष्ण असल्याने थंड हवामानात शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा ‘तीळगूळ’ या पदार्थातून मिळते म्हणून तिळगुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.

या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तीळ व तांदूळ अर्पण करतात व संक्रांत निमित्य सौभाग्य वाण लुटतात. मातीच्या घाटात ओले हरबरे, गाजर, उसाचे करवे आणि सौभाग्यादि वस्तू भरतात. त्याला सुगड असे म्हणतात.

ह्या दिवशी बायकांचे हळदीकुंकू, लहान मुलांचे बोरन्हाण, आणि नवविवाहित दाम्पत्यांचे हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. एकूणच ह्या स्नेह संबंध जपणाऱ्या वाढवणाऱ्या सणाला सामायिक महत्व आहे.

संक्रांतीनंतरचा दिवस म्हणजे किंक्रांत

संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.

पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात.

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो.

मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग उज्जैन व नाशिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरीज कलकत्ता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.

या दिवशी केरळमधील शबरीमाला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.

गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.

सूर्याच्या संक्रांतीच्या रूपाचे वर्णन लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या देवी असे केलेले आढळते.

संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती.

दरवर्षी तिचे वाहन,शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात.

ती एखाद्या वाहनावरबसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते.ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते आणि ज्या दिशेला बघते आणि ज्या दिशेकडे जाते त्या दिशेचे फळ वेग वेगळे असते.

आपल्या संस्कृतीत असलेले सणांचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. समाजात स्नेहबंधाचे महत्व समजावत, आपल्या कृषिप्रधानदेशातील कृषिसंस्कृती जपणारा आणि हवामानातील बदलानुसार शरीराला लाभदायक असे पदार्थ सेवन करण्याचा संदेश देणारा हा मकर संक्रांतीचा सण -- मिळून साजरा करू, म्हणून .......* तिळगुळ घ्या आणि गोड बोला *

-माहिती, प्रिया आपटे


Download the article - Click below

MAKAR SANKRANT.pdf