Menu
Log in


Log in


यशवंत देव

1 Nov 2020 8:57 PM | Amol Sawarkar (Administrator)

forwarded by Mrs Lalita Sukathankar through the BMMS Whatsapp Group

जन्मदिन : १ नोव्हेंबर १९२६.

त्यांचे वडिलच पहिले गुरू होते . देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला,आणि संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली.

एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नव्हते . तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगायचे . त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. (पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी) त्यांनी देवांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मधुवंतीच्या सुरासुरातून श्रीरामाचे चरण धरावे आणि पक्षिणी प्रभाती चारियासी जाये ही गाणी त्यांनी गायली.

गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी असायची तेही देव सांगत . ‘गीताचे सूर त्या गीताच्या शब्दांतच दडलेले असतात हे जाणवलं आणि शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य माझ्या डोक्यात पक्क ठसलं. पुढच्या काळात ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे देवांचं वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असत.

देवांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. असे का घडले, याची त्यांनी केलेली कारणमीमांसा त्यांनी केली होती . त्याचा त्यांनी वास्तववादी दृष्टिकोनातून तटस्थपणे विचार केला होता. त्यांच्या मनात त्या मुळे कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे का मिळाली नाहीत याचे मुद्देसुद विवेचन त्यांनी केले आहे. अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना मिळाला होता. म्हणूनच जीवनात ही घडी अशीच राहू दे (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटातली, तू नजरेने हो म्हटले पण आणि करिते जीवनाची भैरवी ही गाणी विलक्षण गाजली.

देवांनी समस्वरी हा नवीन प्रकार सुरु केला .मूळ हिंदी मराठी गाण्यांच्या चालींना आणि मतितार्थाला धक्का ना लावता नवीन रचना ते त्या चालीत सादर करत असत.लोकप्रिय चालींमध्ये काव्य रचण्याचे कौशल्य ते दाखवत असत.कार्यक्रम सादर करताना समोरचे श्रोते त्यांना इतरांचीही गाणी म्हणायचा आग्रह करत,त्या वेळी त्या कवींच्या कवितांवर केलेले विडंबन काव्य ते म्हणून दाखवत असत.

सांगलीनगरीचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणपती,म्हणून संकष्टी चतुर्थी दिवशी सांगली आकाशवाणी त्यांच्या आवाजातले अथर्वशीर्ष आवर्जून लावते.

आता दोन आठवड्यांवर दिवाळी आली,अनुराधा पौडवाल यांनी गायलेले माझा मुलगा ह्या सिनेमा मधले कवी यशवंत देव ह्यांनी लिहिलेले हे गाणे सगळ्यांना आवडत असेलच.

दिवाळी येणार, अंगण सजणार,आनंद फुलणार घरोघरी

आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत,ओवाळणी थाटात घरोघरी,आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

रांगोळीने सजेल उंबरठा,पणत्यांचा उजेड मिणमिणता

नक्षीदार आकाशकंदील, नभांत सरसर चढतील

ताई भाऊ जमतील, गप्पागाणी करतील

प्रेमाच्या झरतील वर्षासरी

आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

सनईच्या सुरांत होईल पहाट,अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट

गोड गोड फराळ पंगतीला,आवडती सारी संगतीला

फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील

सौभाग्य लुटतील घरोघरी

आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

देवापाशी मागेन एकच दान,भावाच्या यशाची चढो कमान

औक्ष असू दे बळकट, नको करू ताटातूट

चंद्रज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार

भावाविण अंधार दाटे उरी

आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

अशोक चिटणीस यांनी ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे पुस्तक लिहिले आहे

यशवंत देवांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.

९४२२०४११५०