Menu
Log in


Log in


इतिहासात ३१ जानेवारी

31 Jan 2022 5:55 AM | Amol Sawarkar (Administrator)

२०००: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन.

वसंत शंकर कानेटकर (Vasant Shankar Kanetkar) – मराठी विश्वकोशलोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला.

संत कानेटकर यांचे सुरुवातीचे आयुष्य पुण्यात गेले. त्यांचे वडील, कवी गिरीश, हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या आणि रविकिरण मंडळातील इतर कवी यांच्या सहवासातून वसंत कानेटकरांना साहित्यात रस निर्माण झाला. ते लहानपणी नाटिका लिहीत आणि त्यांच्या बालमित्रांसोबत त्यांचे सादरीकरणही करीत.

कानेटकरांनी १९४२-४३ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली. उच्चशिक्षण घेत असताना कानेटकरांना वि. स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक, आणि तत्कालीन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य वि. कृ. गोकाक दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. कानेटकरांच्या मते, त्यांच्या लेखन व शैक्षणिक कारकीर्दीसाठी आवश्यक असलेली जिज्ञासू वृत्ती, अनुशासन आणि चिकाटी ही त्यांना खांडेकरांकडून मिळाली. कानेटकरांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून एम.ए.ची पदवी संपादन केली (१९४६).

१९४६ मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एच. पी. टी. आर्टस् कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजीचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली आणि या संस्थेचे ते आजीव सदस्यदेखील झाले.

१९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. हे नाटक भालबा केळकर यांनी दिग्दर्शित केले, तर पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनने त्याची निर्मिती केली. कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले. कानेटकरांचे पुढचे नाटक अश्रूंची झाली फुले हे त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हे एक सामाजिक, भावनाप्रधान नाटक होते.

कानेटकरांचे लेखक म्हणून अनेक शैलींवरील प्रभुत्व, विषयांचे वैविध्य, नाट्यतंत्रावरील पकड, भाषासौंदर्य आणि संस्मरणीय संवाद यांकरिता ते प्रख्यात होते. १९५० च्या दशकात व्यावसायिक मराठी रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि पुढची चार दशके एकापाठोपाठ एक सरस आणि यशस्वी नाटके देऊन तिला समृद्ध करण्याचे श्रेयही मोठ्या प्रमाणात त्यांना जाते. वेड्याचे घर उन्हांत या नाटकापासून त्यांची नाटककार म्हणून वाटचाल सुरू झाली आणि पुढची चाळीस वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली.

महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व्यक्तींच्या आयुष्यावर कानेटकरांनी चरित्रनाटके लिहिली. या चरित्रनाटकांचे वर्णन कानेटकरांनी स्वतः “कर्मयोगी शोकात्मिका” असे केलेले आहे. हिमालयाची सावली (धोंडो केशव कर्वे), वादळ माणसाळतंय (बाबा आमटे), विषवृक्षाची छाया (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे), कस्तुरीमृग (हिराबाई पेडणेकर) आणि तू तर चाफेकळी (बालकवी ठोंबरे) ही ती नाटके आहेत.

ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९८८). त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव (१९९०) आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९९२).

वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन झाले.

१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

100 Years of Mooknayak, Ambedkar's First Newspaper that Changed Dalit Politics Foreverसमाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले

या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या.

१९९६: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.

Govindrao Patwardhan - Alchetron, The Free Social Encyclopediaहार्मोनिअम वादनाच्या संदर्भात दोन ‘गोविंदरावांचा’ उल्लेख आदराने केला जातो : पहिले गोविंदराव टेंबे व दुसरे गोविंदराव पटवर्धन. कितीही मुश्कील गायकी असली तरी टीपकागदाप्रमाणे ती उचलून आपल्या वादनात सहीसही उतरवणारे गोविंदराव पटवर्धन हे उत्तम एकल हार्मोनिअम वादक म्हणूनही प्रसिद्ध होते.

आपल्या आजोळी, गुहागरजवळच्या अडूर या कोकणातल्या गावी गोविंदराव विठ्ठल पटवर्धन यांचा जन्म झाला. ते १९३० च्या सुमारास वडिलांबरोबर मुंबईस आले. व्हर्न्याक्युलर फायनलनंतर त्यांचे आर्यन एज्युकेशन स्कूलमध्ये शिक्षण झाले व १९४२ साली ते मॅट्रिक झाले. ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजीविकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली, मात्र त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.

गोविंदरावांनी १९४२ पासून मुंबई मराठी साहित्य संघ, ललितकलादर्श व इतर अनेक नाट्यसंस्थांच्या संगीत नाटकांच्या हजारो प्रयोगांना ऑॅर्गनची साथ केली. त्यांची स्मरणशक्ती व अंगातील धमक जबरदस्त होती, त्यामुळे शेकडो संगीत नाटके त्यांना मुखोद्गत होती व त्यांचे तासन्तास चालणारे शेकडो प्रयोग त्यांनी लीलया वाजवले. नाटकात गायकाची पट्टी कोणतीही असो, ऑॅर्गनवर ते नेमकेपणाने सूर देऊन त्या पट्टीत सहजपणे साथ करत.

रूढार्थाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांपासून ते वंचित राहिले. पण त्यांच्या वादनाला मिळणारी गवैयांची व रसिकांची दाद हा पुरस्कार-शिरोमणी त्यांच्या मुकुटात नेहमीच होता. गोविंदरावांना मुंबईतील राहत्या घरी पहाटे हृदयविकाराचा सौम्य झटका आला व त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला.

संदर्भ

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95

https://marathivishwakosh.org/52472/

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8