Menu
Log in


Log in


इतिहासात २७ जानेवारी

27 Jan 2022 5:17 AM | Amol Sawarkar (Administrator)

१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

बालभारतीमहाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था आहे. शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. 

पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमती मधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार याबाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार २७ जानेवारी १९६७ ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना झाली.

मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाले. २०१३ पासून बालभारतीच्या सहाव्या मालेचे प्रकाशन सुरू आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे.

१९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी |धुळे जिल्हातील पिंपळनेर येथे जन्म. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे ⇨केवलाचंद सरस्वती  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्‍लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांच्या स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला.

१९३० व १९३२ साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्रत्येक वेळी ६-६ महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. १९३६ नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले. १९४८मध्ये हा पक्ष विसर्जित होईपर्यंत ते त्याचे सदस्य होते. १९४० पर्यंत व पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशी ते एक विचारवंत भाष्यकार म्हणून निगडित आहेत.

शास्त्रीजींनी व्याख्याने, परिषदा इ. निमित्ताने भारतभर प्रवास केला. अमेरिका, ब्रह्मदेश, रशिया तसेच यूरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यानी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून भेटी दिल्या.

पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत १९५३ साली भारतीय राष्ट्रीयत्वावर दिलेले भाषण, किंवा पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत १९७३ साली वाचलेला ‘द कॉस्मिक स्टेट अँड कलेक्टिव्ह किंगशिप ऑफ वेदिक गॉड्‌स’ हा शोधनिबंध. शास्त्रीजींनी शेकडो व्याख्यानांच्या रूपाने व लेखनाद्वारा केलेले विचारकार्य हा महाराष्ट्राचा एक बहुमोल असा ठेवा मानला जाईल. १९७५ साली त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांचा अमृतमहोत्सव सर्व महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त स्थापन झालेल्या अमृतमहोत्सव समितीने त्यांच्या समग्र लेखनाचे खंड प्रसिद्ध करण्याची योजना आखली आहे. ह्याच वर्षी मुंबई विद्यापीठाने एल्‌एल्‌.डी. ही सन्माननीय पदवी देऊन त्यांच्या विद्वत्तेचा यथोचित गौरव केला. संस्कृत पंडित म्हणून १९७३ मध्ये व ‘पद्मभूषण’ म्हणून १९७६ मध्ये भारत सरकारने त्यांना गौरविले. 

१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. 

श्रीधरपंत आणि इंदिराबाई वैद्य यांच्या घरी २७ जानेवारी १९२६ ला मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं अरुणकुमार.अलिबाग, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत, १९४४ साली, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी अरुणकुमार कॅडेट बनला आणि पुढच्याच वर्षी 'डेक्कन हॉर्स' या पलटणीत दाखल झाला.अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध.

पंजाबमधल्या खेमकरण, असल उत्तर, चीमा या प्रांतात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तुंबळ लढाई झाली. डेक्कन हॉर्स रेजिमेंट या लढाईत कार्यरत होती आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले अरुणकुमार वैद्य. लेफ्ट. वैद्य यांना या लढाईत 'महावीर चक्र' हा दुसरा सर्वोच्च लष्करी पुरस्कार दिला गेला. या लढाईत सुमारे १०० पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले गेले तर ४० पेक्षा अधिक ताब्यात घेण्यात आले.साल १९७१, यावेळी मुख्य लक्ष पूर्व पाकिस्तानवर असलं तरी पश्चिम सीमाही पूर्णतः शांत नव्हतीच. जम्मूपासून अगदी जवळ असलेल्या शकरगढ सेक्टरमध्ये बसंतरच्या लढाईत भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तीव्र सामना झाला. एव्हाना ब्रिगेडियरपदी पोहोचलेले अरुणकुमार वैद्य या युद्धातही होते. या कामगिरीसाठी ब्रिगेडियर वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र प्रदान केलं गेलं ज्याला सैन्याच्या परिभाषेत 'Bar to Maha Vir Chakra' असं म्हटलं जातं.


संदर्भ

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3

https://vishwakosh.marathi.gov.in/17274/

https://www.bbc.com/marathi/india-57395180