Menu
Log in


Log in


आगंतुक पाहुणा

21 Jan 2021 11:49 AM | Amol Sawarkar (Administrator)

लेखिका - स्नेहल लिमये फाटक

आम्ही स्वित्झर्लंडला राहायला लागून जेमतेम वर्ष झालं होतं तेव्हाची ही गोष्ट. इथल्या घरांच्या खिडक्या तिरक्या उघडण्याची सोय असते. म्हणजे वरुन फट आणि खालून बंद. बाहेरून लोखंडी ग्रिल वगैरे अशी काही सुरक्षा नसते. त्या घराचं स्वयंपाकघर आणि दिवाणखाना तळ मजल्यावर होता. तर त्या दिवशी मी 

मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघरातली खिडकी तिरकी उघडी ठेवली होती आणि दिवाणखान्यात काही काम करत बसले होते. मुलगा शाळेत आणि नवरा कामावर गेला होता. मी एकटीच होते घरी. माझं काम चालू असताना स्वयंपाकघरातून काहीतरी आवाज यायला लागले म्हणून धावतच बघायला गेले तर त्या उघड्या खिडकीच्या फटीत एक गलेलठ्ठ मांजर अडकलेली दिसली. तिची आत येण्यासाठी धडपड सुरू होती. ती मला दिसायला आणि तिला तिच्या प्रयत्नात यश मिळायला एकच वेळ साधली गेली. माझ्यासमोरच तिनी ओट्यावर उडी मारली. दोन

 चार भांडी पाडली. सुदैवाने फार सांडलवंड झाली नाही. तीही कदाचित या प्रकारामुळे घाबरली होती त्यामुळे लगेच तिथून धूम ठोकून तिनी सुरक्षित जागी जाऊन म्हणजे सोफ्याच्या खाली ठाण मांडलं. हा सगळा अनपेक्षित घडलेला प्रकार पाहून माझ्याही छातीत धडधडायला 

लागलं होतं. थोड्यावेळानी शुकशुक शॅकशॅक करून, टाळ्या वाजवून सगळं करून पाहिलं पण ती पठ्ठी हलायला तयार नाही. मग विचार केला तिला बाहेर जाण्यासाठी एक दार उघडं ठेवून बाकीची बंद करून आपणही थोडा वेळ बाहेर थांबावं. १०/१५ मिनिटांनी जाऊन पाहिलं तर ती आपली अजून तिथेच. तशी मी मांजरांना घाबरत नाही पण आत्तापर्यंत कुठल्याच मांजरीला स्वतःच्या हातांनी उचलून वगैरे घेण्याचा प्रसंग आला नव्हता. त्यात मी कोणी अनोळखी तिला उचलायला गेले आणि ती फिसकारून अंगावर आली तर ही भीती वाटत होती. तिचं वजनही खूपच असेल असं वाटलं. त्यामुळे तो विचार मी सोडून दिला. मग कामावर गेलेल्या नवर्‍याला फोन केला आणि सांगितलं की अशी अशी मांजर घरात आली आहे आणि आता मी काय करू? त्यानी डोक्यावर हातच मारून घेतला. तो म्हणाला मी तरी इथे बसुन काय करू? बघ शेजारी वगैरे कोणी मदतीला येतंय का. मग मी माझी शेजारीण जिला थोडं इंग्रजी येत होतं तिचं दार ठोठावलं तर ती नेमकी घरात नव्हती. आता पुन्हा मोठा प्रश्न उभा राहिला मदत कोणाची मागावी कारण आम्ही राहत असलेल्या गल्लीतील बहुतेक जण स्थानिक होते. माझी तोंडओळख असलेले इतर २/३ शेजारी होते त्यांना इंग्रजी येत नव्हतं आणि मला जर्मन. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर सामसूम होती. चांगली ओळख असल्याखेरीज असं सरळ कोणाकडे जाणं हे इथल्या शिष्टाचाराला धरून नव्हतं.

तेव्हा तशीच थोडावेळ वाट बघितली आणि माझ्या सुदैवाने समोरच्या घरातली एक बाई काही कामासाठी बाहेर आलेली दिसली. मी लगेच तिला हाका मारून, हातवारे करून मा

झ्या मोडक्यातोडक्या जर्मन मध्ये काय घडलंय ते सांगायचा प्रयत्न केला. तिला बहुदा कळलं ते आणि ती माझ्याबरोबर घरी आली आणि अजूनही त्याच जागी विराजमान असलेल्या त्या मांजरीला तिनी हातानी ओढून काढलं आणि घराबाहेर सोडून आली. मला एवढं हुश्श वाटलं. मी त्या शेजारणीचे खूप आभार मानले आणि तिला निरोप दिला. परत येऊन सोफ्याखाली नजर गेली तर माझ्या इतकीच ती मांजरही घाबरल्यामुळे तिनी तिचा कार्यभाग उरकलेला दिसला. 

अशा या आगंतुक आलेल्या पाहुणीनी चांगलाच प्रसाद दिला होता आणि आठवणीत राहील असा अनुभव देऊन ती निघून गेली. नंतर त्या घरात असेपर्यंत मी त्या स्वयंपाकघराची खिडकी कधीच तिरकी उघडी ठेवली नाही आणि लवकरात लवकर जर्मन शिकण्याचा निर्धार केला.