Menu
Log in


Log in


आमचं जरा.... चुकलंच ना रे? - गणेश काळे

14 Aug 2020 10:55 AM | Amol Sawarkar (Administrator)

विश्व मराठी परिषद - कोविड १९ कथा आणि कविता लेखन

५ वे विशेष पारितोषिक - गणेश काळे, झुरीक

**********

खरं सांग निसर्गराजा,

आमचं जरा.... चुकलंच ना रे?

विकासाच्या घोडदौडीत आम्ही जगभर पसरलो,

राहणीमान उंचावण्याच्या नादात आम्ही तुला मात्र विसरलो,

युद्धामागून युद्धे झाली, राजघराणी आली गेली,

आताशा कुठे समाज स्थिरावत होता,

आताशा कुठे माणूस ‘माणसाळत’ होता,

युगायुगांनंतर लाभणारं शांतिपर्व

अशांतीकडे झुकलंच ना रे?

अगदी मनापासून सांग निसर्गराजा

आमचं जरा.... चुकलंच ना रे?

छोट्याशा एका विषाणूला लावलेस तू आमच्या पाठी,

आमच्या ‘क्षणभंगूर’ असण्याची पुन:प्रचिती देण्यासाठी,

की तू स्वत: टोचून घेतलीस कोरोना नामक एक लस,

माणसासारख्या ‘विषाणूंचा’ बंदोबस्त करण्यासाठी,

सहअस्तित्व, सहजीवनाचं लक्ष्य

थोडक्यासाठी हुकलंच ना रे?

हो नं? निसर्गराजा

आमचं जरा.... चुकलंच ना रे?

कोरोना म्हणतोय आम्हाला, त्रास दिल्याबद्दल क्षमस्व

नवा पाहुणा आहे मी, जाणून घेतोय तुमचं सर्वस्व

आम्ही विषाणू कधी कुठे, भुकेपलीकडे खात नाही

यजमानाला त्रास द्यायला, आमची ‘माणसा’ची जात नाही

सद्य परिस्थितीशी झगडताना,

माणसानेही खूप शिकलं रे

मान्य करतो निसर्गराजा

आमचं...खूप चुकलं रे!

~ गणेश काळे, झुरीक, स्वित्झर्लंड.

************